जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स व सुबोनिया केमिकल्स या कंपनीच्या मालाकांची दिशाभुल करुन तेथे ऑफीस बॉय म्हणून काम करणाऱ्या विशाल डोके या कर्मचाऱ्याने आठ जणांच्या मदतीने चक्क 46 लाख 87 हजार 752 रुपयांचे धनादेश वेळोवेळी कंपनीशी व्यवहार नसलेल्या लोकांच्या नावाने काढले. धनादेश वटवून त्यांनी मालकांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी चार जणांना अटक केली आहे.
या नऊ जणांनी केलीय फसवणूक
सुबोध सुधाकर चौधरी (वय 53, रा. कालिका माता मंदिराच्या मागे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल पोपट डोके (रा. रामेश्वर कॉलनी) याने सुबोध यांचे भाऊ सुनील चौधरी यांच्या कंपनीत काम करीत असताना कंपनीशी व्यवहार नसलेल्या मेघा भुषण खैरनार (रा. ज्ञानदेवनगर), संजय मणीलाल छेडा (रा. गणेश कॉलनी), लतीफ कमरुद्दीन पिंजारी (रा. पिंप्राळा), पूनमचंद रामेश्वर पवार (रा. सिंधी कॉलनी), प्रल्हाद सुनील माचरे (रा. शिवाजीनगर), अविनाश कोमल पाटील (रा. पिंप्राळा), मयुर जमनादास बागडे (रा. जाखनीनगर), विजय आनंदा सैंदाणे (रा. सुप्रिम कॉलनी) या नऊ जणांनी ही फसवणूक केली आहे.
यांना झालीय अटक
यातील विशाल डाेके, लतीफ पिंजारी, मयुर बागडे व प्रल्हाद माचरे या चौघांना पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, सचिन पाटील, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी, इमरान सय्यद आदींच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
वर्षभरापासून कंपनी मालकांची फसवणूक
विशाल डोके हा चौधरी यांच्या कंपनीत ऑफीस बॉय म्हणून काम करीत होता. यावेळी त्याने सुमारे वर्षभरापासून कंपनी मालकांची फसवणूक करण्यास सुरूवात केली. त्याने विविध व्यवहार बनावट दाखवून आठ जणांच्या नावाने धनादेश काढले. हे धनादेश वटवण्यासाठी विशाल याने बँकेत बनावट सह्या केल्या. या बरोबरच मेघा, भुषण, संजय छेडा यांच्या खात्यांवर आरटीजीएसने पैसे पाठवले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. यावेळी चौधरी यांनी फिर्याद दिल्याबरोबर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.