चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शाखा व्यवस्थापक जीवन राजुरकर यांच्या तक्रारीनुसार, उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. या कंपनीला कॉटन जिनिंग व प्रेसिंग उद्योगासाठी बँकेकडून एकूण ₹15,00,00,000/- (₹१५ कोटी) कर्ज मंजूर करण्यात आले होते (मूळ मुदतकर्ज व कॅश क्रेडीटसीमेचा समावेश). कर्जाच्या सुरक्षिततेसाठी कंपनीने व जामीनदारांनी विविध तारखांनी मशीनरीवर हायपोथिकेशन/गहाण नोंदी केल्या होत्या, परंतु नोंद झालेल्या मशीनरी बँकेच्या मालकीची असूनही त्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत.
तपासणी आणि गायब मशीनरी
बँकेच्या वसुली खात्याचे अधिकारी व टीम दिनांक 21/05/2025 रोजी उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. यांच्या रांजणगाव (गट नं. 480/1, 480/2, 480/3, 480/5 व 480/6 — हॉटेल चॅलेंज जवळ) येथील ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी गेले असता, बँकेच्या मालकीची हायपोथिकेशन केलेली मशीनरी जागेवर आढळली नाहीत. नंतर लेखी नोटीस देऊन मशीनरीबाबत खुलासा मागितला असता, कंपनीने आणि संचालकांनी दिनांक 03/06/2025 च्या खुलाश्याद्वारे मशीनरी लेखी परवानगी न घेता विकल्याची कबुली दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. कंपनीकडून तोंडी परवानगी असल्याचे सांगण्यात आले; परंतु तोंडी परवानगी कायदेशीर तरतूद नाही, असा बँकेचा दावा आहे.
थकीत कर्ज रक्कम — आत्ता बाकी किती?
तक्रारीनुसार, दिनांक 31/10/2025 रोजी या कर्ज खात्याची थकीत रक्कम पुढीलप्रमाणे नमूद आहे:
TL.31 (मुदत कर्ज): ₹732.68 लाख
कॅश क्रेडीट (HYPI-13): ₹333.71 लाख
एकूण थकीत रक्कम: ₹1,066.39 लाख (सुमारे ₹10.66 कोटी)
बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे खाते अनुत्पादीत कर्ज (NPA) म्हणून वर्गीकृत केले आहे आणि सरफेसिया कायद्यान्वये वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे, असे तक्रारपत्रात नमूद आहे.
शाखा व्यवस्थापक जीवन नंदकिशोर राजुरकर यांनी ही तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनवर नोंदवली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून काय कारवाई होईल, चौकशी कधी सुरू होईल किंवा कोणत्या कलमान्वये गुन्हे नोंदवले जातील हे तक्रारीत स्पष्ट केलेले नाही; परंतु बँकेने आधीच सरफेसी वार्षिक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे तक्रारपत्रात नमूद आहे.
















