जामनेर (प्रतिनिधी) ‘मै आपकी स्लीप भरके देता हु’ असे सांगत ५० हजार रुपये घेऊन ते पैसे बँक खात्यात न भरता एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शिवाजी रामकृष्ण अवधूत (वय ३६, रा. श्रीराम पेठ जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ जून २०२२ रोजी शिवाजी अवधूत हे त्यांचे अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यासाठी महाराष्ट्र बँक जामनेर येथे गेले होते. यावेळी अनोळखी इसम याने ‘मै आपकी स्लीप भरके देता हु’, असे सांगून शिवाजी अवधूत यांची ५० हजार रुपयांची स्लीप भरली. यानंतर शिवाजी अवधूत यांनी ५० हजार रूपये बँकेत भरण्यासाठी दिले. त्या अज्ञात व्यक्तीने बँकेत भरणा न करता शिवाजी अवधूत यांना सांगितले की, मैने पैसे जमा कर दिये है, थोडी देर मे तूमको पावती मिल जाएंगी. मै साहब लोगो के लिए चाय लेके आता हु, असे सांगून निघून गेला. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. राजू तायडे हे करीत आहेत.