आग्रा (वृत्तसंस्था) गेल्या पाच-सहा दिवसांपासून आग्रा दक्षिण विधानसभेचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना फोन करुन मी गृहमंत्री अमित शाहचा नातेवाईक असल्याची बतावणी करत होता. मात्र, योगेंद्र उपाध्याय यांना संशय आल्याने पोलिसांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. विराज शाह असे आरोपीचे नाव असून आमदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न विराजचा फसला आहे.
विराज शाहने योगेंद्र यांना फोन करुन सांगितलं की, शाह परिवाराला आग्र्यात एक हॉटेल विकत घ्यायचं आहे. यासाठी तो रविवारी योगेंद्र उपाध्याय यांच्या घरी आला आणि त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्याने शॉपिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. शॉपिंग करण्यासाठी तो योगेंद्र यांच्या मुलासोबत बाजारात गेला, अशी माहिती योगेंद्र उपाध्याय यांनी दिली. त्यानंतर विराज शाहने एका दुकानातून तब्बल 40 हजार रुपयांचे कपडे खरेदी केले आणि आमदार पुत्राला पैसे देण्यास सांगितलं. तेव्हा मुलाने योगेंद्र यांना फोन करुन याची माहिती दिली. योगेंद्र यांना संशय आला आणि त्यांनी विराजला पकडण्यासाठी सापळा रचला. योगेंद्र यांनी गुगलवरुन विराज शाहची माहिती मिळवली. तेव्हा त्यांना कळालं की, त्याने यापूर्वीही अनेकांना गंडा घातला आहे.
गुगलवरुन माहिती घेण्यापूर्वी आमदाराने आपल्या मुलाला कपडे घरी पाठवण्यास सांगितले आणि विराजला घेवून घरी येण्यास सांगितलं. विराजला याबाबत जराही शंका आली नाही की त्याला पकडण्यासाठी हा सापळा रचण्यात आला आहे. आमदार योगेंद्र यांनी विराजला पकडण्यासाठी नाई येथील मंडी पोलिसांना माहिती दिली आणि विराजला त्यांच्या स्वाधीन केले. तसेच, जे घडलं त्याबाबत विराजविरोधात तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विराज शाहला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली.