जळगाव (प्रतिनिधी) मामाच्या मित्रासोबत ओळख करुन त्यांच्या मोबाईलच्या ॲपद्वारे परस्पर कर्ज घेतले. त्यातून ५८ हजारांचे दोन महागडे फोन घेत फसवणूक केली. कर्ज घेतलेल्या कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यासाठी कॉल आल्याने ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नासीर शेख निसार (वय २०, रा. नाशिक) या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शाहू नगरात राहणारे शाहरुख शेख नजीर (वय ३२) हा तरुण वास्तव्यास असून त्याची खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मित्राचा भाचा नासीर शेख याच्याशी ओळख झाली. त्यामुळे नासीर हा शाहरुख यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर येऊन बसायचा. दररोज गप्पा मारून त्याने विश्वास संपादन केला व विक्रेत्याचा मोबाईलही वापरू लागला. त्यादरम्यान त्याने दि. २१ फेब्रुवारी व दि. २५ फेब्रुवारी रोजी मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार केले. त्यात खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाद्वारे ३५ हजार ५४७ रुपये व व २३ हजार ५८ रुपये असे एकूण ५८ हजार ६०५ रुपयांचे दोन मोबाईल परस्पर घेतले.
कॉल घेत नसल्याने झाली फसवणुकीची खात्री मामाच्या मित्राला न विचारता परस्पर घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले जात नसल्याने कंपनीकडून शाहरुख शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नासीर हाच मोबाईल घ्यायचा व त्याने ही फसवणूक केली असावी म्हणून शेख यांनी त्याच्याशी संपर्कही साधला मात्र तो कॉल घेत नसल्याने त्यानेच फसवणुक केल्याची खात्री झाली.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी शाहरुख शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नासीर शेख निसार (२०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.