धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना वारंवार वीज खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांचे घरगुती उपकरणे जळून खाक झाली असून व्यावसायिक व्यवहारांवरही याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज धरणगाव व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पाटील हे देखील उपस्थित होते.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली. विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे शहरातील व्यापारी वर्गासोबतच ग्रामीण भागातील शेतकरीही संकटात सापडले आहेत. विशेषतः शेतीपंप, मोटारी व अन्य कृषी उपकरणे बंद पडल्याने शेती कामांवर विपरीत परिणाम होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येची गंभीर दखल घेत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी भाजपचे ॲड. संजय महाजन, विजय महाजन, वासूदेव चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय कोठारी, धीरेंद्र पुरभे, दिलीप महाजन, वाल्मीक पाटील, संतोष महाजन, योगेश मांडगे, प्रमोद जगताप, महेंद्र कोठारी, एस.डब्ल्यू. पाटील यांच्यासह अनेक व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यानंतर व्यापारी व नागरिकांनी लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.