भाटपुरा/वरझडी (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावात मित्रांमध्ये झालेल्या भांडणात मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मित्रास पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात, छोटीबाई गोटु बहिरम रा. झेंडेअंजन ता. शिरपूर, यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा दिर देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम हा दि. ७ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी असतांना गावातील त्याचा मित्र विकास विजय महाले हा आला व त्याने देविदास यास त्याच्यासोबत बाहेर नेले. देविदास व विकास या दोघांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास काही कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने विकास महाले याने देविदास बहिरम याच्या डोक्यात दगड घालून त्यास गंभीर जखमी केले. त्यास उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन देविदास यास पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावरुन संशयित विकास महाले याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांनी संशयित विकास महाले यास अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.
















