नाशिक (वृत्तसंस्था) मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरात काही मित्रांमध्ये दारूची पार्टी सुरू असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. पोलिसांनी संशयित हल्लेखोरांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विष्णू शिंदे (वय २८, रा, मखमलाबाद नाका, क्रांतीनगर, पंचवटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चारचाकी व दुचाकीवरू आले हल्लेखोर आलेत !
मखमलाबाद रोडवरील जगझाप मळा परिसरात शुक्रवारी (दि. १३) दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास सागर व त्याचे मित्र एका दुकानाच्या ओट्यावर बसून मद्यप्राशन करीत होते. त्यावेळी संशयित केदार साहेबराव इंगळे (वय २५, रा. कोशिरे मळा, हनुमानवाडी), व त्याचे पाच ते सहा साथीदार चारचाकी व दुचाकीवरून या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सागर व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच एकाने सागर शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
पोटात आणि डोक्यावर खोलवर गंभीर !
या हल्ल्यात सागर याच्या पोटात आणि डोक्यावर खोलवर गंभीर जखमा होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर अन्य एक जण जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आकाश मोतीराम गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत व संशयित हल्लेखोर एकमेकांचे मित्र !
सागर शिंदे व संशयित हल्लेखोर हे एकमेकांचे मित्र होते. मात्र, सागर शिंदे याचे केदार इंगळे याच्या वडिलांसोबत दोन ते तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. यावेळी सागर याने संशयिताच्या वडिलांना शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून संशयित केदार इंगळे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी मिळून सागर याची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर शिंदे याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल आहेत.
अवघ्या काही तासांतच चौघा संशयित हल्लेखोरांना शिताफीने घेतले ताब्यात !
खुनाची घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासांतच हल्लेखोरांचा माग काढत, केदार इंगळे याच्यासह ऋषीकेश रामचंद्र आहेर (वय २३, रा. श्रीकृष्णनगर, मोरे मळा, पंचवटी), दीपक सुखदेव डगळे (वय २३, रा. मोरे मळा, रामनगर पंचवटी), नकुल सुरेश चव्हाण (वय १८, रा. काकडबाग मोरे मळा, पंचवटी) या चौघा संशयित हल्लेखोरांना कसबे सुकेणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. तर या घटनेतील इतर दोन संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.