मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच या विधानामुळे सावंत यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्यामुळे अखेर तानाजी सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून, मराठा समाजाची माफी मागितली आहे.
ज्या समाजामुळे मी आहे. ज्या समाजामुळे मी ताठ मानेने वावरतो. त्या समाजाची माफी मागायला मला कसलाही कमीपणा वाटत नाही. मी एकदा काय एक लाख वेळा मी माझ्या समाजाची माफी मागतो, असं मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. मी मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. फक्त ते टिकणारं आरक्षण असावं, असं म्हणत तानाजी सावंत यांनी आपली मागणी सांगितली आहे. माफी मागताना तानाजी सावंत म्हणाले की, माझं विधान मराठा समाजाला खटकलं असेल तर मी मराठा समाजाची माफी मागतो. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं ही माझी भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता.