जळगाव (प्रतिनिधी) गुगल मॅपला रिव्ह्यू देण्यासह क्रिप्टो ट्रेडिंग करण्याचे टास्क देऊन प्रगत गोपाल गाडीलोहार (वय २४, रा. पाचोरा) या एआय अभियंत्याला ९ लाख १२ हजारात ऑनलाईन गंडविले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तीन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील रहिवासी असलेले प्रगत गाडीलोहार यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी तीन अनोळखींनी व्हाटसअॅप व टेलिग्रामद्वारे संपर्क साधला. त्यांना गुगल मॅपला रिव्ह्यू देण्यासह क्रिप्टो ट्रेडिंग करण्याचे टास्क दिले. त्यामधून त्यांना अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार सुरुवातीला प्रगत यांनी चार हजार ३० रुपये गुंतवल्यानंतर त्यांना नफ्यासह पाच हजार ८३९ रुपये परतावा देण्यात आला. प्रगत यांना चार हजार ३० रुपयांच्या गुंतवणुकीवर एक हजार ८०९ रुपये नफा व मुद्दलही देण्यात आल्याने त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला.
पाच दिवसात वेळोवेळी नऊ लाख १२ हजार ११४ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारले. नंतर मात्र त्यावर नफा व मुद्दलही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रगत गाडीलोहार यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्या अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.