नवी मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय पोस्ट खात्याच्या नावाने बनावट योजना चालवणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका पोस्टमास्टरसह चार जणांना अटक केली आहे. तसेच २७ जानेवरीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीकडून तब्बल ५ कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पनवेल पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, काही जणांनी पोस्ट खात्यातील योजनांचे बनावट प्रमाणपत्र तयार केले आहे. ही टोळी पनवेल येथील एचडीएफसी बँकमध्ये येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बँकेच्या परिसरात सापळा रचला. अखेर ही टोळी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकेत आल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून दोन केव्हीपी आणि सात एनएससी जप्त केले आहे. पोस्ट खात्याने हे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. बाबाराव गणेशराव चव्हाण (२४ वर्ष, नांदेड), सुप्रभात माल्लाप्रसाद सिंह, (वय ५०, खारघर), संजयकुमार अयोध्या प्रसाद (वय ४६, खारघर), दिनेश रंगनाथ उपदे (वय ३९ वर्ष, ठेकेदार, मुंबई -चेंबूर) यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता २७ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पनवेलचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील झोन 2 यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट केव्हीपी (किसान विकास पत्र) आणि एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) जप्त केले आहे. तसेच या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सहा बनावट केवीपी (प्रत्येक किंमत ५० लाख रुपये) एकूण ३ कोटी रुपये, १० बनावट केवीपी (प्रत्येक केवीपी किंमत २०,००,००० रुपये) एकूण २ कोटी रुपये आणि ८६,५०,००० किंमतीचे ९ केवीपी जप्त केले आहे. पोलिसांनी एक २,६५,००० रुपयांची कार सुद्धा जप्त केली आहे. पोलिसांनी एकूण ५,८९,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने बनावट कागदपत्र दाखवून इतक बँकाकडून कर्ज घेतली आहे. विश्वास नागरी पथ संस्था, नेरुळ या बँकेकडून ५०,००,००० रुपयांच्या बनावट कागदपत्रांवर १२,००,००० रुपयांचे कर्ज घेतले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.