चाळीसगाव (प्रतिनिधी) कुटुंब अंगणात झोपले असल्याचा फायदा घेत चोरटे घरात शिरले. त्यांनी लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले १ लाख हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास खेरडे गावात घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील खेरडे गावात कौशल्याबाई अरूण जाधव या वास्तव्यास आहे. बुधवारी त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि ते घरात उकाडा होत असल्याने अंगणात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा नातूला भुख लागल्यामुळे कौशल्याबाई या झोपतून उठून घरात दूध आणण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना घराचा दरवाज्याची कडी उघडुन दरवाजा उघडलेला दिसला. घरात गेल्यानंतर त्यांना लोखंडी कपाटामधील लॉकर तोडुन त्यातील ठेवलेल्या स्टिलच्या डब्यातील सोन्याच्या कानातील बाळया, सोन्याच्या मंगळसुत्र वाट्या, सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील काप असा सुमारे १ लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी कौशल्याबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अक्रम बेग मिर्झा करीत आहेत.