जळगाव प्रतिनिधी : तालुक्यातील धानवड येथे एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोड्या झाल्या तर एका ठिकाणी प्रयत्न फसला. यामध्ये भिका बळीराम पाटील (५४, रा. धानवड) यांनी घराच्या बांधकामासाठी ठेवलेल्या रोख तीन लाख रुपयांसह सोने, चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविला. दोन जणांचा एकूण पाच लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना २४ जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानवड येथील शेतकरी भिका पाटील यांनी शेतीमालाचे आलेले तीन लाख रुपये घराच्या बांधकामासाठी जमा करून ठेवले होते. तर सोने-चांदीचे दागिनेही त्या सोबत कपाटात ठेवले होते. घर बांधायचे असल्याने भाडेतत्वावर घर घेऊन त्यांचे दोन्ही मुले तेथे राहत होते. तर भिका पाटील व त्यांच्या पत्नी जुन्याच घरात राहत होते. २३ जानेवारी रोजी ते पत्नीसह जामनेर तालुक्यातील लाहसर येथे साडूकडे गेले. त्या वेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातून रोख तीन लाख रुपये, एक लाख ७१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. त्याच दिवशी त्यांच्या घराजवळ राहणारे योगेश प्रभाकर मानके यांच्या घरातूनरोख ७० हजार रुपये तसेच चांदीचे दागिने चोरीला गेले.
२४ रोजी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांच्या मुलाने त्यांना फोन करून कळविले. त्या वेळी ते घरी परतले व घरात ऐवज पाहिला असता तो सापडला नाही व घरात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. या प्रकरणी भिका पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.















