धौलपूर वृत्तसंस्था । घरात झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमूळे पिडीतेस मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले आणि त्याला झाडाला बांधून ठेवले. कुटुंबीयांनी आरोपीला बसेडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या वडिलांनी दोन्ही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. आरोपींविरोधात बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी घरात झोपली होती. काल मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास मुलीच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. आवाज ऐकून घरातील इतर सदस्य झोपेतून जागे झाले. खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर शेजारी गावातील बंटी आणि हरिकेश हे शस्त्रांसह खोलीतून बाहेर निघाले. दोघे आरोपी पळून जात होते. कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी बंटीला पकडले. तर दुसरा आरोपी हरिकेश हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पळून जाणाऱ्या एका आरोपीला पीडितेच्या कुटुंबीयांनी चोप दिला. त्याला झाडाला बांधले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे बलात्काराच्या घटनेमुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.