जळगाव (प्रतिनिधी) राज्याला गुटखा पुरवणारी टोळी चाळीसगावात कार्यरत असून गांजाचे देखील मोठे रॅकेट काम करत करतेय. तसेच यासर्व प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. ते जळगावात पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, धुळे येथून चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता एक गुटख्याने भरलेला ट्रक येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मेहूनबारे येथे गुन्हे शाखेच्या पथकाने हा ट्रक अडविला. ट्रकची तपासणी केली असता त्यात अंदाजे ५० लाखांचा गुटखा असल्याचे दिसून आले. परंतू अचानक हा ट्रक स्थानिक पोलीस स्थानकात न नेता जळगावला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यासाठी रवाना झाला. याची माहिती मला माहिती मिळताच आपण ट्रकचा पाठलाग सुरु केला. त्यानुसार पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा ट्रक जैन कंपनीजवळ थांबविला. या ठिकाणी उपस्थित पोलीस कर्मचारी आमचा काही दोष नाही, आम्ही वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतोय, असं सांगितले. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांना फोन केला. परंतू त्यांनी व्यवस्थित संवाद साधला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी माझा अपमान केला. तसेच माझी फिर्याद घेण्यास नकार दिला. गुटख्याचा ट्रक मेहुणबारेच्या हद्दीत पकडल्यानंतरही तेथे गुन्हा का दाखल करण्यात आला नाही? यावरून आपण गुन्हे शाखेच्या पोलीसांना जाब विचारला, असेही आ.चव्हाण म्हणाले. तर संबंधित गुटखा बनविणारे, विक्री करणारे तसेच दोषी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील आ.चव्हाण यांनी केली. माझ्या विरोधात भविष्यात पोलीस प्रशासन खोटा गुन्हा दाखल करेल. पण मी देखील आता हायकोर्टात जाणार आहे. एवढेच नव्हे तर गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचेही आ.चव्हाण यांनी सांगितले.