जळगाव (प्रतिनिधी) खूनाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये, यासाठी न्यू. बी. जे. मार्केटसमोरील चांदेलकर प्लाझाधील पत्त्याच्या सोशल क्लबमध्ये पार्टनर असलेल्या अरुण भीमराव गोसावी (रा. तुकारामवाडी) यांच्यावर टोळक्याने हल्ला करून सामानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तसेच हा क्लब चालवायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरीने काढून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील तुकारामवाडीत राहणारे अरुण गोसावी हे चांदलकर प्लाझा येथील वरच्या मजल्यावर नशिराबाद स्पोर्टस फाऊंडेशन या सोशल पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर आहे. त्यांचे भागीदार ब्रिजलाल आनंदराम वालेचा हे असून गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास विकास रमेश सोनवणे व ब्रिजलाल वालेचा हे क्लब बंद करुन आवराआवर करीत होते. त्यावेळी सुमारे पंधरा जणांचे टोळके हातात लाठ्या काठ्या घेवून वरच्या मजल्यावर आले. गोसावी यांनी त्यांना काय झाले असे विचारणार तोच भूषण माळी उर्फ भाचा याने त्यांना शिवीगाळ करीत आमच्याविरुद्ध केस चालवू नको सांगितले तरी, त्याला समजत नाही आज त्याचा मर्डर करुन टाकू, तुम्ही सोशल क्लब कसा चालवता, आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भागीदार ब्रिजलाल वालेचा हे त्यांना सोडविण्यासाठी गेले, मात्र त्यांना देखील धक्काबुक्की करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.
१५ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भुषण उर्फ भाचा विजय माळी रा. तुकारामवाडी, आकाश संजय पाटील रा. वाघनगर, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर रा. तुकारामवाडी, आकाश सुकलाल ठाकूर उर्फ खंड्या रा. तुकारामवाडी, आकाश उर्फ अक्की रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी, चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशिर रा. पिंप्राळा, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी रा. सम्राट कॉलनी, दादू विजय ठाकूर रा. तुकारामवाडी, उमेश उर्फ उमाकांत वाघ रा. पिंप्राळा, भूषण अहिरे रा. पिंप्राळा, विक्की ईश्वर चौधरी रा. अयोध्या नगर, उमाकांत पाटील रा. पिंप्राळा, विनायक कोळी रा. जिल्हापेठ, जे. के (पुर्ण नाव माहिती नाही) व पि. के (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबरदस्ती पैसे काढून घेत वाहनांची केली तोडफोड
मारहाण केल्यानंतर टोळक्याने गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेत क्लबमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले. त्यानंतर अपार्टमेंटच्या खाली उभ्या असलेल्या दुचाकींची देखील या टोळक्याने तोडफोड करीत नुकसान करुन ते तेथून पसार झाले.
एकाला रंगेहाथ तर दुसऱ्या रात्रीतून अटक
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड सुरु असतांना परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. यावेळी तोडफोड करणाऱ्या आकाश संजय पाटील याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर रात्री शोध मोहीम राबवित उमेश उर्फ उमकांत वाघ रा. पिंप्राळा याला ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.