चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोर अजंटी येथील वन विभागाच्या नाक्याजवळ मध्य प्रदेशातील दोन तर मुंबई येथील एक अशा तिघांना गावठी कट्ट्यासह चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २५ हजारांचा गावठी कट्टा जप्त केला आहे.
मध्य प्रदेशातील दोन व मुंबई येथील एक जण असे तिघे मिळून २५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा घेऊन मध्य प्रदेश कडून चोपड्याच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी बोरअंजटी गावाजवळील वन विभागाच्या नाक्याजवळ २० रोजी दुपारी साडेचार वाजता सापळा रचून बडवाणी जिल्ह्यातील वरला तालुक्यातील खोकरी येथील राकेश खजऱ्या मोरे (वय २१) व मुन्ना वेस्ता मोरे (वय २०) यांना तर मुंबईमधील भोईसर येथील गोठल चाळमधीर महेश मनोहर भोईर (वय २७) यांना गावठी कट्टयासह रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, ही कारवाई करताना महेश मनोहर भोईर याच्या कंबरेला जुना २५ हजाराचा गावठी कट्टा, रोख २ हजार २०० रुपये, तसेच राकेश मोरे याच्याजवळ ७०० रुपये रोख तर, मुन्ना मोरे याच्याजवळ ५०० रुपये रोखे व ८ हजाराचा एक मोबाईल, ५० हजाराची हिरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमपी- ११, क्यू- ११८५) ही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पो. ना. रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . या तिघांना चोपडा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस नाईक शशिकांत पारधी करत आहेत.