जामनेर (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने जामनेर येथे मोठी कारवाई केली आहे. शहरातील खादगाव रोडवरून एलसीबीच्या पथकाने गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह एका तरूणाला अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, एलसीबीचे प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना गुप्त बातमीदारामार्फत जामनेर शहरात खादगाव रोड वर एक इसम गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने किरणकुमार बकाले यांनी पथकाची निर्मिती केली. या पथकाने बाळू शामा पवार (वय २१, रा. डोहरी तांडा ता, जामनेर) या संशयित तरुणाची चौकशी करून त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेस एक गावठी कट्टा आणि एक राऊंड काडतुसे असणारे मॅगझीन आढळून आले. या अनुषंगाने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची वैदयकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही साठी जामनेर पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई एलसीबीचे प्रमुख पोलीस निरिक्षक किरणकुमार वकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फोजदार अशोक महाजन, हवालदार महेश महाजन, लक्ष्मण पाटील, पो. ना. किशोर राठोड, रणजित जाधव, कृष्णा देशमुख, पो. कॉ. विनोद पाटिल, ईश्वर पाटील आणि भारत पाटील यांच्या पथकाने पार पाडली.