जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती देण्याची नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक कैलास सोनवणे यांची याचिका आज मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. या वृत्ताला विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक सदाशिव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी, नगरसेवक कैलास सोनवणे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, शिक्षेला स्थगिती देण्याची या पाचही जणांची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. येथील बहुचर्चीत घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान चार नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात १६ मार्च २०२० रोजी न्यायालयात विशेष दावा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दावा दाखल केला आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता हे पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, आपल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी संबंधित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. तायडे यांच्या खंडपीठाने ही याचिका आज फेटाळून लावली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयासमोर प्रभावी मुद्दे मांडले. घरकुल घोटाळ्याची व्याप्ती किती आणि कशी मोठी आहे?, तसेच कशा पद्धतीने योजनाबद्ध पद्धतीने हा घोटाळा करण्यात आला, हे न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर या पाचही जणांची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावल्याची माहिती अॅड. प्रवीण चव्हाण यांनी दिली. दरम्यान, यामुळे या सर्वांचे नगरसेवक पद धोक्यात आल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दरम्यान, नगरसेवक भगत बालाणी आणि कैलास सोनवणे यांनी या निकालाबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.