नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेतील कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना संजय राऊत यांनी मनोगत व्यक्त केलं. राऊत यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. राऊत म्हणाले,”गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब आहे. त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे आम्हीही भावूक झालो.
ज्यांच्यासोबत काम केलं. ती व्यक्ती आज सभागृहातून जात आहे. मला विश्वास आहे की, ते पुन्हा सभागृहात परत येतील. त्यांनी इंदिरा गांधीपासून ते मोदीजींपर्यंतचा काळ बघितला. त्यांनी इंदिरा गांधी ते मोदी असं पुस्तक लिहायला हवं. जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं होती. तेव्हा आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येते आणि यशस्वी झाले,” असं राऊत म्हणाले. “त्यांचं महाराष्ट्रासोबत त्यांचं फार जुनं नातं आहे. जसं की शरद पवारांनी सांगितलं की, त्यांनी वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आले होते. त्यामुळे तिथे आजही त्यांच्याविषयी बोललं जातं. ते मराठीतून बोलतात. मोदी जसं मराठीतून बोलतात.. तसं आझादही बोलतात. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. पण, संपूर्ण देश जाणतो, असे आझादांसारखे नेते खूप कमी आहेत. मी आझाद यांना निरोप देत नाही. ते परत सभागृहात येईपर्यंत मी त्यांची वाट बघेन,’ अशा भावना संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केल्या.
गुलाम नवी आजाद २००५ ते २००८ पर्यंत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते तब्बल ४१ वर्षे संसदेच्या राजकारणात सक्रिय होते. २०१४ मध्ये ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते. ते पाच वेळा राज्यसभा आणि दोन वेळा लोकसभेत खासदार राहिले. आजाद यांच्यासह भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फैयाज आणि नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळ संपत आहे. आजाद आणि नजीर अहमद यांचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी रोजी आणि मन्हास आणि मीर फयाज यांचा कार्यकाळ १० फेब्रुवारी रोजी पूर्ण होत आहे.
















