जळगाव (प्रतिनिधी) आ. एकनाथराव खडसे यांची सून रक्षाताई खडसे या केंद्रिय मंत्री झाल्या असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन व आ. खडसे यांना विकासासाठी एकत्र आणण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली पाहिजे आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आगोदर आ. एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश होणार होता. परंतू राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी पक्षप्रवेशाला विरोध केल्यामुळे भाजपा प्रवेश आ. खडसे यांचा प्रवेश थांबला असल्याची चर्चा आहे. परंतू आता केंद्रिय मंत्रीपदी रक्षाताई खडसे यांची वर्णी लागल्यामुळे भाजपातील काही प्रमाणात का असेना सत्ता केंद्र खडसे यांच्याकडे वळले आहे. केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे या मंत्री गिरीश महाजन व आ. एकनाथ खडसे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सांगितले की, पश्चिम महाराष्टातील नेते त्यांच्या भागातील विकासासाठी एकजुट होतात. त्याप्रमाणे जळगाव जिल्हयातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विकासासाठी गरज असेल तेव्हा एकत्र यावे, ही माझीच नाही तर जनतेची अपेक्षा आहे. मंत्री गिरीश महाजन व आ. एकनाथ खडसे यांना केंद्रिय मंत्री रक्षाताई खडसे या दोघांना एकत्र आणणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे असे घडले तर त्याला आमच्याही सदिच्छा असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.