जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्यापैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व कायम राखले आहे. ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकविला आहे.
गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र, त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत. तालुक्यात ६८ ग्रामपंचायती पैकी भारतीय जनता पक्ष आणि तब्बल ४५ जागांवर विजय मिळविला आहे. उर्वरित जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेनेने विजय मिळविला आहे. तर वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरित ६८ ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या आहे.
जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. त्यात बीएचआर पतसंस्थेचा घोटाळा बाहेर आला. त्याबाबत गिरीश महाजन यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. तसेच मविप्र संस्थेतील संचालक वाद प्रकरणातही गिरीश महाजन यांचे नाव आले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांची जामनेर तालुक्यात अद्यापही पकड कायम असल्याचे दिसून आले आहे.
















