जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटले आहे. निम्म्या जिल्ह्याची तहान भागणार असून नागरिकांनी गुलाबभाऊंचे आभार मानले आहेत. दरम्यान, गिरणा धरणातून निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, यांना दिलेल्या आदेशानुसार दि. 24 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन दोन हजार क्यूसेस (56.63 Cumecs) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.
पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदापर्यंत पोहोचणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या आवर्तनामुळे कानळदा व इतर परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असल्याने नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच निम्म्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीबाणीत आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर आवर्तन सुटल्याने पुढील ५० दिवसांची चिंता मिटणार आहे. या पाण्यामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान पुढील काही दिवसांसाठी भागणार आहे.