मुंबई (वृत्तसंस्था) मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याचे (Gold) उच्चांक गाठला होता तर त्यानंतरच्या सहामाहीत सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आता आगामी वर्षात सोन्याच्या भावांतील ही मरगळ झटकली जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी (experts) वर्तवला आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी वर्षात सोने ५५ हजार रुपयांपर्यंत जाईल.
सोन्याच्या आगामी वाटचालीविषयी बोलताना कॉमट्रेन्ड्झचेसह संस्थापक व सीईओ ज्ञानेशेखर त्यागराजन म्हणाले, मागील वर्षात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भांडवली गुंतवणुकीकडे बाजार आकर्षित झाला. परिणामी दुसऱ्या सहामाहीत सोन्याच्या मागणीत काहीशी घट दिसून आली. अमेरिकेतही ओमिक्रॉनचे संकट पाहता नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने दरकपात केल्यास डॉलरचे महत्त्व वाढणार आहे. तरीही सोन्याकडे गुंतवणूकदार वळू शकतील. कारण जगभरात चलनवाढीचा धोका निर्माण झाल्याने लोक सोन्यात पैसा गुंतवून तो सुरक्षित करण्यावर भर देत असतात. शेअर बाजारातील चढउतार व राजकीय अस्थिरता आल्यासदेखील सोन्याचे भाव वाढू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, आगामी वर्षात सोने ५५ हजार रुपयांपर्यंत जाईल. यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये सोन्याच्या भावाने एमसीएक्स वायदेबाजारात ५६,२०० रुपये एवढा उच्चांक गाठला होता. सध्या एक तोळा सोन्याचा दर ४८,००० रुपयांच्या दरम्यान आहे.