जळगाव प्रतिनिधी – राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे.
उत्पादन वाढले, दर घटले
यंदा राज्यात ज्वारी लागवड लक्षणीयरीत्या वाढली असून उत्पादनात देखील वाढ झाली आहे. मात्र खुल्या बाजारात ज्वारीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. अनेक ठिकाणी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री करावी लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत होती .
पणन महासंघ आणि शासनाचा पाठपुरावा, केंद्राचा निर्णय
या पार्श्वभूमीवर पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आणि सर्व संचालक मंडळ यांचे वतीने राज्य शासन , केंद्र शासनाकडे ज्वारी खरेदी कालावधी वाढवण्याची विनंती केली होती. केंद्र शासनाने ती मान्य करून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्वारी खरेदीस परवानगी दिली आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती मंत्रालयातून प्रसिद्ध करण्यात आली. शासन निर्णयानुसार खरेदी करताना केंद्र शासनाच्या पत्रातील सर्व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
रोहित निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन
या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले –
“वेळोवेळी आम्ही राज्य आणि केंद्र सरकार कडे पाठपुरावा करत होतो . शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. खुल्या बाजारातील दर घटले असले तरी शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवरच ज्वारी विक्री करावी. कोणताही शेतकरी नुकसानात जाऊ नये, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकरी बांधवांना आता ३० सप्टेंबरपर्यंत किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्री करता येणार आहे.”















