मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला असून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पडळकरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात ?
“बहुजनांच्या बाजूने उभं राहिल्यामुळे यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी,” अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. “गोपीचंद पडळकर यांच्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.