मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान प्रकरणात आणखी एक पंच साक्षीदार विजय पगारे यांनी मोठा दावा केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात डील झालं होतं आणि हे डील किरण गोसावी याने आर्यन खान याच्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे बारगळलं, असा दावा विजय पगारे याने केला आहे. तसेच विजय पगारे याचा मुंबई पोलिसांच्या एसआयटीने जबाब नोंदवला आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी किरण गोसावी याचा आर्यनसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. याच सेल्फीमुळे आर्यनच्या सुटकेसाठी ठरलेलं संपूर्ण डील बारगळल्याचा दावा विजय पगारेने केला आहे. त्यासाठी त्याने किरण गोसावी व सुनील पाटील या दोघांमधील संभाषणाचा हवाला दिला आहे. ‘तुझ्या सेल्फीमुळे डील फेल झाली. एवढी तुला काय मस्ती आली होती सेल्फी काढायला. तुझ्यामुळे १८ कोटी हातचे गेलेत. माझी काय अवस्था झाली आहे तुला माहीत आहे का? मी भीकारी झालो आहे. येथे समोर देणेकरी बसलेत. त्यांना पैसे द्यायचे आहेत. मी म्हणतो काय तुला इतकी चरबी होती’, असे सुनील पाटीलने किरण गोसावीला फोनवर सुनावल्याचे पगारे याचे म्हणणे आहे. पैसे परत कर, असे सुनील पाटील गोसावीला ओरडत होता. त्यावर माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. मी ३८ लाख रुपये पाठवून दिले आणि चारपाच लाखांची व्यवस्था करतो आणि ते पाठवतो, असे गोसावी पाटीलला म्हणाला. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी मला पाटीलनेच सगळं सांगितलं, असाही पगारेचा दावा आहे.
सुनील पाटील द ललित हॉटेलमध्ये राहायला होता. तिथे सॅम डिसूझा, मनीष भानुशाली हे सतत यायचे. या हॉटेलमध्ये त्यांच्या अनेक पार्ट्या झाल्या. त्यात ड्रग्ज पार्ट्याही झालेल्या आहेत, असा दावा विजय पगारे याने केला आहे. ललित हॉटेलमध्ये किरण गोसावी कधीही आला नाही. तो अहमदाबादमध्ये सुनील पाटीलला भेटला होता. किरण गोसावी गुप्तहेर आहे, अशी ओळख पाटील याने करून दिली होती, असेही पगारे याने सांगितले.