जळगाव (प्रतिनिधी) मंत्रालयात किंवा संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे तक्रार केल्यास महाविद्यालयाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे थेट पत्र काढले आहे. अशाप्रकारे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना धमकावण्याच पत्र महाविद्यालय प्रशासनातर्फे काढणं अतिशय दुर्दैवी असून या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करत कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी केली.
दि. ७ एप्रिल २०२१ रोजी स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावच्यावतीने विद्यार्थ्यांकरीता धक्कादायक पत्र काढण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे विकास शुल्क व अन्य शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जाते व अभाविपने वेळोवेळी महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात देखील आणून दिले आहे. परंतु महाविद्यालय प्रशासन स्तरावर शुल्काबाबत कुठलेही कारवाई करत नाही असे दिसून आले आहे. शासकीय अभियांत्रिकीचे महाविद्यालय शुल्क, खाजगी महाविद्यालय शुल्का पेक्षा जास्त आहे व कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना देखील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात महाविद्यालय शुल्क आकारले जाते हे दुर्दैवी आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये शासनाच्यावतीने शुल्कामध्ये कपात करणे अपेक्षित होते. परंतु कुठलेही कपात महाविद्यालयीन शुल्कामध्ये शासनाने केलेली नाही.
महाविद्यालय प्रशासनाला महाविद्यालयीन शुल्क संबंधित विषय वेळोवेळी लक्षात आणुन देखिल कुठलीही कारवाई न केल्यामुळे महाविद्यालयाच्या त्रस्त विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व संबंधित शैक्षणिक विभागास वरील विषय कळवण्याकरिता विद्यार्थ्यांनी केलेल्या इमेल्सला शासनाकडे कुठलेही उत्तर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना धमकावण्याचे पत्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल आहे. कोणाच्या दबावाखाली विद्यार्थ्यांना धमकावण्याचे पत्रक महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आले?
विद्यार्थ्यांना पत्राद्वारे सांगण्यात आले आहे की “यापुढे मंत्रालयात किंवा संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल द्वारे तक्रार केल्यास महाविद्यालयाने शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे थेट पत्र काढले आहे.” अशाप्रकारे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना धमकावण्याच पत्र महाविद्यालय प्रशासनातर्फे काढणं अतिशय दुर्दैवी आहे व या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व महाविद्यालयाने पत्रक लवकरात लवकर मागे घ्यावे अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशे महानगर मंत्री आदेश पाटील यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालय परिसरात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाविद्यालय प्रशासनाला जाग करण्याचं काम केलं.
यावेळी अभाविपचे महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, हिमानी वाडीकर, दुर्गेश वर्मा, मयुर अल्कारी, अंकित चव्हाण, मनिष चव्हाण, कृष्ण भारी व आदी कार्यकर्त्यांनी कोरणाचे नियम पाळून प्राचार्यांना घेराव घालून जोरदार निदर्शने केले.















