जळगाव (प्रतिनिधी) ग्रामीण वाटचालीत सरपंच आणि ग्रामसेवक गावाला मूलभूत सुविधांपासून ग्लोबल उंचीपर्यंत पोहचवण्याचे काम करतात.जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासह लोकसहभागातून मोठे काम उभारलेल्या ग्रामपंचायतींना सन्मानित करणारा राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज ग्रामसेवा पुरस्कार सोहळा तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त येत्या ३० एप्रिल रोजी ग्रामगौरव प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
आदर्श ग्रामपंचायती,शासकीय योजनांची उत्कृष्ठ अंमलबजावणी करणारे सरपंच व ग्रामसेवक, गावातील विविधांगी कामे एकूणच राज्याच्या ग्रामविकासाची सकारात्मक बाजू यांची दखल घेवून राज्यभर पोहचवण्याच्या उद्देशाने पुण्यातून सुरू झालेल्या ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने या उंचिदार कार्यक्रमात राज्य,विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरीय याप्रमाणे उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक व पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी या बंधू-भगिनींना आणि उत्कृष्ठ पंचायतराज संस्था म्हणून ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे.
पाच सदस्यीय निवड समिती-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी समिती गठीत व्हावी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकाशक डॉ.पंकज आशिया यांची प्रकाशनाचे समूह संपादक विवेक ठाकरे व ब्यूरो हेड नंदलाल मराठे यांनी नुकतीच भेट घेतली. ग्रामपंचायत,सामान्य प्रशासन आणि ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,चाळीसगाव पंचायत समितीचे बीडीओ आणि जिल्हा माहिती अधिकारी अशी पाच सदस्यीय निवड समिती यासाठी कार्यरत राहणार आहे.
३१ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन –
पुरस्कार तसेच प्रस्तावासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क, जाहिरात किंवा प्रायोजकत्व अशी अट राहणार नसून जिल्ह्यात आगळे वेगळे काम उभे केलेल्या ग्रामपंचायती,कल्पक तसेच विकसाभिमुख सरपंच आणि लोकाभिमुख ग्रामसेवक यांनी आपापल्या कामांचे छायांकित प्रस्ताव दोन प्रतीत प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीकडून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ३१ मार्च पर्यंत सादर करावेत,असे आवाहन प्रकाशनाच्या एडिटर इन चीफ कु.धनश्री ठाकरे यांनी केले आहे.