अमरावती (वृत्तसंस्था) सिमेंट क्रॉंक्रिट रस्ता व नाली बांधकामाची नोटशिट तयार करून बिल मंजुरीसाठी पाठविण्यासोबतच मागील कामाच्या मंजूर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाठोडा खुर्द येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. केशव भीमराव मदने (वय ३७, रा. ब्राह्मणवाडा थडी, चांदूरबाजार) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांनी वाठोडा खुर्द येथे सिमेंट क्रॉंक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम केले. ४ लाख ७७ हजार रुपयांच्या या कामाची नोटशिट तयार करून बिल मंजुरीसाठी पाठविण्यासोबतच मागील कामाच्या मंजूर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात ग्रामसेवक केशव मदने यांनी त्यांना ९२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली.
पडताळणीत ग्रामसेवक केशव मदने यांनी ९२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तिवसा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला.
यानंतर तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने ग्रामसेवक केशव मदने याला अटक केली. त्याच्याविरुद्ध तिवसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक केतन मांजरे व विजया पंधरे, वैभव जायले, नितेश राठोड, युवराज राठोड, आशिष जांभोळे, सतीश किटुकले आदींनी केली.