नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात मथुरा येथे पाच दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेच्या हत्येची हत्या करण्यात आली होत. या हत्येचा आता उलगडा झाला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, वृद्ध महिलेच्या नातीनेच तिच्या प्रियकरासह मिळून आपल्या आजीचा खून केला.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, पालीखेडा गावात ८ मार्च रोजी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती आणि त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या तिच्या नातीने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आजीची हत्या झाल्याचे सांगितले होते. मात्र, तपासादरम्यान असे आढळून आले की, नातीसोबत तिच्या प्रियकराने ही घटना घडवून आणली.
आजीच्या डोक्यावर वार करत केली हत्या
आजीने आपल्या नातीला तिच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत शेजारच्या मुलासोबत खोलीत भेटताना पाहिले होते. त्यांच्या प्रेमप्रकरणावर आक्षेप घेतल्यानंतर नातीने आजीची हत्या केली. आजीने खोलीत दोघांना एकत्र पाहिल्यावर दोघांचे कृत्य त्यांच्या पालकांसमोर उघड करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीने प्रियकरासोबत मिळून आजीच्या डोक्यावर वार करत हत्या केली. घटनेच्या जागेवरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली काठी आणि दोघांचे मोबाईल जप्त केले असून दोघांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.