धुळे (प्रतिनिधी) आजीच्या दशक्रियेला जाताना नातवाचा हृद्यविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फागणे शिवारात मालेगाव- चोपडा बसमध्ये शनिवारी सकाळी घडली. रवींद्र देवराम खैरनार (वय ५६, रा. सोयगाव ता. मालेगाव), असे मयताचे नाव आहे. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रवींद्र खैरनार हे मालेगाव कृषी महाविद्यालयात ते कार्यरत होते. ते शनिवारी चोपडा येथे आजीच्या दशक्रियेला जाण्यास निघाले होते. त्यासाठी ते मालेगाव बसस्टॅण्डला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत कुटूंबिय होते. मालेगाव- चोपडा बसने ते अमळनेर मार्गे चोपड्याकडे जात असतांना फागणे गावातून बस जात असतांना रवींद्र खैरनार यांच्या छातीत कळ आली.
कुटुंबिय व बस चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बस थांबवण्यात आली. त्यानंतर खासगी वाहनाने रवींद्र खैरनार यांना लागलीच हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. पोलिस कर्मचारी सुमित ठाकूर तपास करता आहे.