वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोनाच्या थैमानामुळे हतबल झालेल्या अमेरिकन नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिकन नागरिकांना घरच्या घरीच कोरोना चाचणी करता येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीचे निकाल ३० मिनिटात समजणार आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या चाचणी किटला मान्यता दिली आहे.
अमेरिकेत आरोग्य कर्मचारी घरी येऊन कोरोना चाचणी करू शकत होते. आता मात्र, स्वत:ला कोरोना चाचणी करता येऊ शकते. फक्त घरीच नव्हे तर रुग्णालयातही या किटचा वापर करता येणार आहे. १४ वर्षावरील व्यक्तिंची कोरोना चाचणी मात्र आरोग्य कर्मचाऱ्यालाच करावी लागणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त स्टिफन हान यांनी म्हटले. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक कोटींहून अधिक झाली आहे. तर, अडीच लाखांहून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटी ६० लाखांहून अधिक झाली आहे. तर, १३ लाख जणांना प्राण गमवावे लागले आहे.
एकदाच वापरता येणारी ही चाचणी किट ल्युकिरी हेल्थने तयार केली आहे. आपात्कालीन स्थितीमध्ये याचा वापर करता येऊ शकतो. चाचणीसाठी नाकातील स्वॅब नमुना घेऊन ही चाचणी करता येऊ शकते. या किट वापर १४ वर्षावरील व्यक्ती करू शकतात, असे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यांपासून या लशींना आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.