जळगाव (प्रतिनिधी) जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगाव परिमंडलात पंतप्रधान सुर्यघर मोफ़त वीज योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. परिमंडलात ऑगस्ट 2024 च्या दुसऱ्या आठवडा अखेरपर्यंत 20440 प्रस्तावांना सर्व्हेक्षणानंतर तांत्रिक परवानगी देण्यात आली आहे. 4185 घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयत्र बसविण्यात आले असून त्याव्दारे 15.7 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होऊ शकते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यात महाविरतणतर्फ़े पंतप्रधान सूर्यघर मोफ़त वीज योजनेला प्राधान्य देण्यात येत आहे. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवून त्याव्दारे तयार झालेली वीज वापरण्याची ही योजना आहे. ग्राहकाने वापरुन शिल्लक राहिलेली वीय़ महावितरणला विकण्याचीही या योजनेत तरतूद आहे.
जळगाव परिमंलातही या योजनेची अमंलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. योजनेत ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी मुख्य अभियंता श्री इब्राहिम मुलाणी यांच्या निर्देशानुसार जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महावितरणतर्फ़े ग्राहक जागृती मेळावे घेण्यात येवून त्यात पंतप्रधान सुर्यघर मोफ़त वीज योजनेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी परिमंडलातील बहुतांशी खेडी, पोड, वाड्या आणि गावागावांतून ग्रामसभेच्या माध्यमातून योजनेबद्दल लोकांना माहीती देण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, आठवडी बाजारपेठ आदी ठिकाणी योजनेचे पाम्पल्पेट्स, बॅनर्स लावून योजनेत वीज ग्राहकांचा सहभाग वाढविण्यात आला.
टेक्नीकल फ़िजिब्लीटी तपासणीनंतर जळगाव जिल्ह्यात 14302, धुळे 3806 तर नंदुरबार जिल्ह्यात 2332 घरांवर सौरऊर्जा पॅनल बसविण्यास महावितरणतर्फ़े मंजूरी देण्यात आली आहे. त्याशिवाय, जळगाव जिह्यात 2511, धुळे 1077 तर नंदुरबार जिल्ह्यात 597 घरांवर सौरऊर्जा निर्मिती संयत्र बसविण्यात येऊन त्यातून सौरऊर्जा निर्मिती प्रक्रिया सुरु आहे. त्यातून सुमारे 15.7 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण होऊ शकते.
मंजूर प्रस्तावकांनी शासनाने निर्धारित केलेले रजिस्ट्रेशन शुल्क भरुन मान्यता प्राप्त गुत्तेदार (सौरऊर्जा संयत्र इन्स्टॉलर) निवडायचा आहे. तरच मंजूर प्रस्तावाकांच्या घरांवर सौरऊर्जा संयत्र बसविण्याला गती मिळू शकते.
ही योजना ग्राहकहिताची आहे. निर्माण झालेल्या सौर वीजेचा वापर करुन शिल्लक राहिलेली वीज महावितरणला विकता येते. त्यातून ग्राहकाचे वीज बील शुन्यावर येऊ शकते. या योजनेसाठी शासनाची सबसिडी आहे. 1 किलोवॅट करिता 30 हजार रुपये, 2 किलोवॅट करिता 60 हजार तर 3 किलोवॅटच्या संयत्रासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान आहे. याशिवाय, योजनेसाठी सर्व क्षेत्रातील बॅंकाही सहज कर्ज सुविधा उपलब्ध करुन देत आहेत.
वीज ग्राहकांनी योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी pmsuryghar.gov.in या संकेत स्थळासह पीएम सूर्य घर नावाच्या मोबाईल ॲप वरुनही नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी केले आहे.