चाळीसगाव (प्रतिनिधी)– जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत चाळीसगाव येथे तक्रार निवारण सभा पार पडली. या सभेस आमदार मंगेशदादा चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हा उपक्रम नागरिकांना थेट आपल्या अडचणी, तक्रारी व समस्या प्रशासनासमोर मांडता याव्यात या हेतूने सुरू करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच असा थेट जनसंपर्क आणि तक्रार निवारणासाठी एखाद्या CEO ने पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.
यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे, जगताप, जिल्हा प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास भदाणे, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम सुनिल पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन परदेशी,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चाळीसगावात झालेल्या या सभेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली आणि ती संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालू होती. या दरम्यान १०० हून अधिक नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्या. काही तक्रारींवर त्याच वेळी निर्णय घेऊन त्या जागीच निकाली काढण्यात आल्या, तर उर्वरित तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा, कृषी, बांधकाम अशा विविध विभागांशी संबंधित प्रश्न आणि अडचणी थेट मांडण्याचे व्यासपीठ नागरिकांना मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची आणि समस्यांचे लवकरात लवकर निराकरण होण्याची एक सुवर्णसंधी या उपक्रमामुळे प्राप्त झाली आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः तालुक्याच्या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या ऐकतात, आणि कर्तव्यदक्ष व संवेदनशील प्रशासनाची प्रचिती जनतेला देतात.