अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित गंगाराम सखाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते सैनिकांसाठी दिवाळी शुभेच्छापत्रे बनवली आहेत. आज तालुक्यातील माजी सैनिकांना प्रातिनिधिक स्वरूपात समारंभपूर्वक ही शुभेच्छापत्र देण्यात आली. विद्यार्थ्यांनी बनवलेली ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे देशातील विविध भागातील सैनिकांना देण्याची खर्चासह जबाबदारी मंगळग्रह सेवा संस्थेने घेतली आहे.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन व शाळेचे चेअरमन योगेश मुंदडा यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा पत्रांचे अवलोकन केले. विद्यार्थी आणि शिक्षकांचे त्यांनी कौतुकही केले. दरम्यान कार्यक्रमात निवृत्त सैनिक राजेंद्र यादव यांनी शाळेतर्फे राबवण्यात आलेल्या या आगळ्या- वेगळ्या आणि अनुकरणीय उपक्रमाबद्दल शाळेचे आभार व्यक्त केले. सैन्याच्या व्यथा व जनतेप्रती असलेल्या भावनिक अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्याध्यापक डिगंबर महाले यांनी शाळा राबवित असलेल्या व अन्य शाळांपेक्षा ‘हटके’ असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करावी असे आवाहन केले. यावेळी उपमुख्याध्यापक अशोक करस्कार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी सैनिक राजेंद्र यादव, विनोद पाटील, जितेंद्र सोनवणे, विशाल पाटील, राकेश पाटील, प्रमोद पाटील उपस्थित होते.
माजी सैनिकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते शुभेच्छापत्र देण्यात आली. ‘भारतमाता की जय’ ची विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सर्वाधिक शुभेच्छापत्रे बनवणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक महाले यांनी रंगपेटी देऊन त्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन अमित पाटील यांनी केले. बी. एस. पाटील यांनी आभार मानले.