जळगाव (प्रतिनिधी) रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत माझे मेहुणे पिंटू इटकरी हे साधारण १५ वर्षापासून नौकरी करत होते. त्यामुळे त्यांचा सुरेशचंद्र हुकुमचंद्र जधवानी आणि ओमप्रकाश सचदेव यांच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांनी इटकरे आणि माझ्यासह इतरांच्या नावे फर्म तयार करून सर्व घोटाळा केला आहे. आम्ही निर्दोष असून मुख्य लाभार्थी आणि सूत्रधार जधवानी आणि सचदेव हेच असल्याचा खळबळजनक आरोप संशयित पिंटू इटकरेचा शालक कैलास भारुडे यांनी ‘द क्लीअर न्यूज’सोबत बोलतांना केला आहे.
जीएसटी घोटाळ्यातील मुख्य संशयित पिंटू इटकरेला डीजीजीआयच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत शालक कैलास भारुडे हा देखील गेला होता. दुसरीकडे नोकरीचे आमिष दाखवून (नटवर टॉकिजच्या समोर) फसवणूक करण्यात आल्याबाबत पहूरच्या दोन तरुणांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नौकरीच्या निमित्ताने विविध कागदपत्र घेवून त्यांच्या नावावर फर्म तयार करून कोट्यांवधीचा जीएसटी घोटाळा केल्याचे नुकतेच वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने धाड टाकल्यानंतर समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर ‘द क्लीअर न्यूज’सोबत मुख्य संशयित पिंटू इटकरेचा शालक कैलास कौतिक भारुडे (रा. पहूर ता. जामनेर) याने संपर्क साधत आपली आपबिती कथन केली आहे. कैलास भारुडेने सांगितले की, रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत माझे मेहुणे पिंटू इटकरी हे साधारण १५ वर्षापासून नौकरी करत होते. त्यामुळे सुरेशचंद्र हुकुमचंद्र जधवानी आणि ओमप्रकाश सचदेव यांनी त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करून तसेच खोटं सांगून विविध कागदपत्र मिळवून घेतली. तसेच माझे मेहुणे इटकरे यांच्या संपर्कातील किंबहुना विश्वासातील लोकांची देखील अशाच पद्धतीने कागदपत्र गोळा करून घोटाळा केला आहे. तसेच या कंपनीचा वालेचा नामक सीएने इटकरेच्या नावाचा ई-मेल आयडी सर्व ठिकाणी वापरला. त्यामुळे सगळीकडे इटकरे यांचेच नाव दिसत आहे. परंतू या प्रकरणात इटकरे किंवा माझा कोणताही संबंध नाही. आमचा विश्वास संपादन करून आम्हाला यात गोवण्यात आले असल्याचा आरोप कैलास भारुडे यांनी केला आहे. तसेच आज इटकरे यांच्या जामीन अर्जासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याचे देखील सांगितले.