जळगाव (प्रतिनिधी) शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील आणि उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करुन भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येथील जिल्हा परिषदेत आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डी.आर.लोखंडे, बी.ए.बोटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर ढिवरे, उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम. देवांग यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. तसेच भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी सर्वांना स्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद ढगे व सहकारी कलाकारांनी महाराष्ट्र गीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.