धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका व्यापाऱ्याचा तब्बल साडेसात लाख रुपयांच्या कपाशीने भरलेला ट्रक लांबविणाऱ्याला धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात गुजरातमधून अटक केली. ऐनदिवाळीच्या वेळी मोठे नुकसान टळल्यामुळे व्यापाऱ्याने धरणगाव पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, भरत भाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा. न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, येथील कापूस व्यापारी सुनील विठ्ठल वाणी (रा. दत्त दुर्गा नगर, धरणगाव) यांनी मुक्ताईनगर निमखेडा येथील शेतकऱ्याकडून साडेसात लाखाचा १४१ क्विंटल कापूस खरेदी केला होता. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सदर कापूस त्यांनी आदर्श ट्रान्सपोर्टचे मालक हसीन रशीद खान बेळगाववाला यांच्या मार्फत ट्रक (क्र. जी.जे. ११ व्ही.व्ही. ८८०५) यात भरून गुजरात राज्यातील अमेरीली जिल्ह्यात विक्रीसाठी महावीर कोटींचे मालक व तेथील व्यापारी योगेशभाई यांच्याकडे पोहोचविण्यास सांगितले होते. दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुनील वाणी यांच्या लक्षात आले की, ट्रक चालक व मालकाशी संपर्क होत नाहीय. त्यांनी याबाबत ट्रान्सपोर्टचे मालक हसीन बेळगाववाला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ट्रान्सपोर्ट मालकांनी सांगितले की, त्यांचा देखील ड्रायव्हर व गाडी मालक यांच्याशी होत संपर्क नाहीय. त्यामुळे सायंकाळपर्यंत सुनील वाणी यांची खात्री झाली की, त्यांचा कापूस चोरीला गेला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक जे.एम.हिरे यांची भेट घेत, हकीगत सांगितली. श्री.हिरे यांनी तात्काळ फिर्याद नोंदवून घेत रात्रीच तपास पथकाला गुजरातकडे रवाना केले. या पथकात पीएसआय अमोल गुंजाळ, पोहेकॅ खुशाल पाटील, उमेश पाटील यांचा समावेश होता.
दि. १० नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील बेडवान शिवार, ता.डेडीयापाडा भागात आरोपीचा शोध घेऊन एकाला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण १४१ क्विंटल कापूस काढून दिला. याप्रकरणी भरत भाई अंबाबाई मंगू किया (वय ४८, रा. न्यू कतारगा वरीयार रोड, सुरत) याला अटक करण्यात आली आहे.. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी त्यांचा माली तर राज्यात विक्रीसाठी पाठवितांना ट्रक चालक-मालक कागदपत्रे इत्यादींची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले.