अहमदाबाद (वृत्तसंस्था )गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार सुरु असून २४ तासांत तब्बल १४ जणांनी आपला जीव गमावला आहे.
पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्ग बंद झाले. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत मागील २४ तासांत मुसळधार पावसाने तडाखा दिला. अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांनी प्राण गमावले. यापैकी नऊ जणांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला आहे. बुधवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंतच्या चार तासांत जुनागड, गिर सोमनाथ, डांग, अमरेली या भागांमध्ये ४७ ते ८८ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र भागातील जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ‘रेड अॅलर्ट’ दिला आहे. दरम्यान, या पावसाळ्यात आत्तापर्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे. त्याखेरीज ५१ राज्य महामार्ग व ४०० पंचायत रस्त्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.