नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीएसई बोर्डाने १२ वीच्या परीक्षेत विचारलेल्या एका प्रश्नावरुन सध्या गदारोळ सुरु आहे. समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी सीबीएसई बोर्डाने माफीदेखील मागितली आहे. सीबीआय बोर्डाची सध्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्याच्या पहिल्या सत्रातील परीक्षा सुरु आहे. बुधवारी १२ वीचा पहिला पेपर झाला. यानंतर हा वाद सुरु झाला.
“२००२ साली कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?” असा प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या खाली भाजप, काँग्रेस, डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन असे चार पर्याय देण्यात आले होते. यातला एक पर्याय निवडायचा होता. या प्रश्नामुळे पेपर झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर सीबीएसईने ट्विटरवर याबाबत माफी मागितली.
आजच्या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न चुकीचा असून, सीबीआयच्या पेपर सेटिंगच्या नियमावलीचं उल्लंघन करणारा आहे. या प्रकरणाची दखल घेतली गेली असून, यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल,” अशा आशयाचं ट्विट सीबीएसईने केलं होतं. “प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी केवळ अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची निवड करावी तसंच लोकांच्या भावना दुखावतील असे सामाजिक, राजकीय प्रश्न टाळावेत असं सीबीएसईची मार्गदर्शक तत्त्वं म्हणतात,” असंही सीबीएसईने दुसऱ्या एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं.