जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाला पक्षातील सर्वात वरिष्ठ नेत्यांची संमती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याबाबतची पोस्ट राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी टाकली आहे. यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने बहुमताचा आकडा सर केला आहे. त्यानुसार जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ११ जागा निवडून आलेल्या आहेत. तर त्या खालोखाल ६ जागा शिवसेना आणि काँग्रेसच्या ३ जागा निवडून आलेल्या आहेत. तर भाजपची एक जागा निवडून आलेली आहे. आता तिन्ही पक्षांकडून जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी दावेदारी केली जात आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथम चेअरमन पदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर,डॉ.सतीश पाटील, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर आणि अॅड. रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतू देवकर यांच्या नावाला राष्ट्रवादीतील सर्वात वरिष्ठ नेत्यांची संमती मिळाल्याची पोस्ट खुद्द प्रदेश प्रवक्त्यांनी टाकल्यामुळे चेअरमन पदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
Comments 1