जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा गुलाबराव देवकर यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. कारण त्यांच्या राजीनाम्याला संचालक मंडळाची मंजुरी नसल्याचे पत्र सहकार निवडणूक आयुक्तांकडून जिल्हा बंॅकेला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या देवकरच बँकेचे अध्यक्ष म्हणून कायम आहेत.
गुलाबराव देवकर यांच्या समर्थकांच्या नाराजीमुळे त्यांचा राजीनामा लांबणीवर देखील पडला हाेता; परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे राजीनामा सुपुर्द केला हाेता. तेथून अंंतिम मंजुरीसाठी सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडे राजीनामा पाठवण्यात आला हाेता.
दरम्यान, बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करून नंतरच इकडे पाठवण्यात यावा अशी सूचना सहकार विभागाकडून करण्यात आली असून, तसे लेखी पत्र जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता बँकेकडून लवकरच पुढील आठवड्यात संचालक मंडळाची बैठक बाेलावण्यात येणार आहे. या बैठकीत बहुमताने राजीनामा मंजूर झाल्यानंतरच ताे मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात येईल. ताेपर्यंत देवकर हेच बँकेचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. दरम्यान, संचालक मंडळाची बैठक बाेलावण्यासंदर्भात बंॅकेकडून लवकरच अजेंडा काढला जाईल.