नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणी डेरामुखी राम रहीम सहित पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, सर्व दोषींना १२ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या प्रकरणी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सगळ्या आरोपींना दोषी ठरवलं आहे. आरोपी डेरामुखी गुरमीत रामरहिम आणि कृष्ण कुमार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर राहिले तर आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल हे प्रत्यक्ष हजर होते. न्यायालयाने या प्रकरणी पहिला निकाल २६ ऑगस्ट रोजी सुनावला होता. फिर्यादी पक्षाचे वकील एसपीएस वर्मा यांनी सांगितलं की, १९ वर्षे जुन्या प्रकरणामध्ये गेल्या १२ ऑगस्ट रो जी बचाव पक्षाचा अखेरचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. सीबीआयचे न्यायाधीश डॉ. सुशील कुमार गर्ग यांच्यासमोर जवळपास अडीच तास युक्तीवाद चालल्यानंतर त्यांना दोषी ठरवलं गेलं.
२००३ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती
१० जुलै २००२ ला डेऱ्याच्या प्रबंधन समितीचे सदस्य राहिलेल्या कुरुक्षेत्र रणजीत सिंह यांचा खून झाला होता. पोलिस तपासाने असमाधानी असलेल्या रणजीतच्या वडिलांनी जानेवारी २००३ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. सीबीआयने या प्रकरणाचा तपास करत आरोपींवर खटला दाखल केला होता. २००७ मध्ये न्यायालयाने आरोपींवर चार्ज फ्रेम केले होते.
















