जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ-जळगाव महामार्गावर गुटखा तस्कराला जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एलसीबीच्या पथकाने २ लाख ७५ हजाराचा गुटखा जप्त करत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात गुटखा व पानमसाला, तंबाखू जन्य पदार्थ विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना मिळाल्याने त्यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व स्थानिक गुन्हे शाखेचे किसन नजनपाटील यांना गुटखा विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. किसन नजनपाटील यांना दि. ४ जानेवारी रोजी गुप्त बातमी मिळाली की, शेख इम्रान शेख जहुरोउद्दीन (रा. तांबापुरा, जळगाव) हा त्याच्या ताब्यातील इंडिका कार (क्र. एमएच १९ एएक्स ३५१०) हया गाडीत भुसावळ ते जळगाव या हायवे रोडने तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा वाहतुक करीत आहे.
पो.नि. किसन नजनपाटील यांनी पोउनि गणेश चोभे, सफौ युनूस शेख इब्राहिम, पो.ना. रणजित अशोक जाधव, पो.ना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पो.कों विनोद पाटील, चापोकों प्रमोद ठाकुर, अशांचे पथक रवाना केले. या पथकाने सापळा रचत इंडिका कारसह शेख इम्रानला जळगाव – भुसावळ हायवे रोडवरील टोल नाक्याजवळ थांबवून सदर गाडीची तपासणी केली. या कारमध्ये २ लाख ७५ हजार २६४ रुपयाचा विमल पान मसाला व तंबाखू मिळून आली. यानंतर एलसीबीच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांना प्राचारण केले.
या बाबत नशिराबाद पो.स्टे.ला CCTNS नं.३/२०२३ भादंवि क. २७२,२७३,१८८,३२८ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२), ३० (२)(१),५९,२६ (२) (iv), २७ (३) (b) (c) प्रमाणे आरोपी शेख इम्रान शेख जहुरोउद्दीन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईत २ लाख ७५ हजार २६४ रुपयाचा विमल गुटखा व दीड लाखांची इंडिका कार असा एकूण ४ लाख २५ हजार २६४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.