मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील प्रमुख प्रवर्तन चौकात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने विमल गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनास पकडून अंदाजे २५ लाखांचा साठा जप्त केला. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. (team of Food and Drug Administration seized stock of banned Vimal Gutkha from Muktainagar)
राज्यात गुटखा बंदी असताना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून येणाऱ्या एमएच १९ सीवाय ४७९२ या क्रमांकाच्या वाहनामधून लाखो रुपयांचा विमल गुटख्याची तस्करी प्रवर्तन चौकात वाहन पकडल्यानंतर उघड झाली. हे वाहन येथील पोलिस ठाण्यात आणून त्यातील विमल गुटख्याच्या ५४ पोत्यांत २२ लाखांचा गुटखा व तीन लाखांचे वाहन असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत केल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकळ व सहाय्यक आयुक्त अधिकारी संतोष कांबळे यांनी माध्यमांना दिली. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात सोयाबी इस्माईल शेख यांनी पंच साक्षीदार म्हणून साक्षी नोंदवली. टेम्पोचा चालक चंद्रकांत लक्ष्मण हटकर (रा. तांबापुरा, जळगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान,आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकताच विधानपरिषदेत मध्य प्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून, यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता.