जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये जळगाव महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या गटारींच्या कामामुळे जनतेला मनस्ताप होत आहे. बांधकामासाठी गटारी मोकळ्या केल्याने रस्त्यांमध्ये पाणी सोडून दिल्याचे वास्तविक चित्र आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महापौरांनी तत्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या असतानाही कामे होत नसल्याने नागरिकांविषयी महापालिकेची उदासिनता समोर आली आहे.
जळगाव शहरात सुरू असलेल्या गटारींच्या कामांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जळगावकरांना विकासकामांचाच विटाळ आला आहे. ठेकेदार अर्धवट कामे सोडून देत असल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. जळगाव शहरातील जुनी जैन फॅक्टरी परिसरातील हर्षवर्धन कॉलनीमध्ये असाच प्रकार घडला आहे. गटारी बांधकाम करण्यासाठी गटारी मोकळ्या केल्याने पाणी मोकळे सोडून दिले जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांनी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घटनास्थळ गाठले. हर्षवर्धन कॉलनीमधील रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून घेत महापालिकेचे प्रकाश पाटील नामक अधिकाऱ्यांना व संबंधित कामाच्या ठेकेदारांना गटारींचे काम लागलीच करण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवस उलटूनही महापालिकेने याकडे दुर्लेक्ष केले आहे. घरात येण्या-जाण्यासाठीसुद्धा हर्षवर्धन कॉलनीतील रहिवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान परिसरातील गटारींचे कामे लवकर करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.