नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. हरयाणातील निकाल हा अनपेक्षित असल्याचे नमूद करत त्यांनी विविध विधानसभा मतदारसंघांतून येत असलेल्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे मांडल्या जाणार असल्याचे म्हटले. तर जम्मू-काश्मिरातील ‘इंडिया आघाडी’चा विजय हा राज्यघटना व लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय असल्याचे ते म्हणाले.
सोशल माध्यम ‘एक्स’वरून प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे हृदयापासून आभार मानले. केंद्रशासित प्रदेशातील इंडिया आघाडीचा विजय हा राज्यघटना आणि लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय आहे. तर हरयाणातील अनपेक्षित निकालाचे आमच्याकडून विश्लेषण केले जात आहे. अनेक विधानसभा मतदारसंघांतून येत असलेल्या तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडल्या जातील, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्याचबरोबर आपल्या पक्षाला मते दिल्याबद्दल त्यांनी हरयाणाची जनता आणि आपल्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमासाठी आभार मानले.
हक्कासाठी, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी, सत्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आमचा हा लढा सुरूच ठेवू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला ९० पैकी ४८ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २९ जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे हरयाणात भाजपने एक्झिट पोल्सला हुलकावणी देत सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्तेला गवसणी घातली. या ठिकाणी भाजपने ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला. तर सत्तेची अपेक्षा बाळगून असलेल्या काँग्रेसच्या झोळीत ३७ जागा पडल्या.