मुंबई वृत्त संस्था | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार तात्पुरते असून, गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातही निवडणुका लागतील, असा मोठा संजय राऊतांनी केला.
जोपर्यंत मुंबई महाराष्टात शिवसेना मजबूत आहे. तोपर्यंत दिल्लीकरांचे इरादे सफल होणार नाहीत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगतो. तसेच सध्या महाराष्ट्रात असलेली व्यवस्था ही तात्पुरती आहे. ती फार काळ टिकणार नाही. भाजपाला शिवसेना फोडायची होती. त्यांनी ती फोडून दाखवली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
कदाचित गुजरातच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातही मध्यावती निवडणुका लागू शकतात. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपने केली आहे. आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीने सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले. तसेच आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलो आहोत हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि तो राहील. १६ आमदारांच्या अपत्रातेबाबत याचिका प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणे घटनाबाह्य आहे, असेही राऊत म्हणाले.
















