धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वराड बु. येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला डोक्यात वीट टाकून खून केल्याची खळबळजनक घटना १४ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १४ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वराड बु. गावी रामजी ऑईल मील जवळ नजरीया शुभाराम कुमारीया (वय- ३५, व्यवसाय-मजूरी, रा. करचोली ता. सेंधवा जि. (मप्र) ) ह.मु. रामजी ऑईल मील जवळ वराड बु. ता. धरणगाव) याचे पत्नी बानुबाई यांच्यात भांडण सुरु होते. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी बिसन भोडा नरगावे (वय – ४०,व्यवसाय-मजूरी, रा.करचोली ता. सेंधवा जि. बडवानी (मप्र) याने मध्यस्थी केली. दारूच्या नशेत असलेल्या नजरीया आपल्या पत्नीला मारहाण करायला लागला असता बिसन पुन्हा दोघांचे भांडण सोडवायला गेला. यावेळी आमच्या नवरा बायकोच्या भांडणात का बोलतो?, असे बोलून नजरियाने बिसनच्या डोक्यावर विटेने, तोंडावर व छातीवर मारहाण करुन जिवे ठार मारले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद आर. कठोरे हे करीत आहेत.